लोकमत | ९ जुलै २०१७
आज बदल आणि गतिमानता समाजाचा स्थायीभाव झाला आहे. प्रत्येक क्षेत्रात प्रचंड वेगाने होणारे बदल व विकासाचे प्रमुख कारण तपासले तर तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर हेच उत्तर मिळते. तंत्रज्ञान मानवी जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे. प्रत्येक क्षेत्रात तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर होत असताना शिक्षणक्षेत्रही त्यास अपवाद नाही. पारंपारिक शिक्षणपध्दतीला फाटा देत तुडवलेल्या वाटांनी न जाता अनेक शिक्षक विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता विकासासाठी आपली नवी वाट शोधु पाहत आहे. शिक्षकांना नव्यानव्या संकल्पना कार्यान्वित करण्याची प्रेरणा तंत्रज्ञान देते. तंत्रज्ञानावर आधारित अनेक नवोन्मेष शालेय शिक्षणात पाहावयास मिळत आहेत. आज महाराष्ट्र राज्याच्या प्राथमिक शिक्षणाचे चित्र पाहावयाचे झाले तर जवळपास दिड लाखांहून अधिक शिक्षकांनी राज्याच्या टेकसेव्ही टिचर्स या संकेतस्थळावर स्वयंस्फुर्तीने तंत्रस्नेही शिक्षण म्हणून नोंदणी केली आहे. राज्याचे शिक्षण सचिव मा.नंदकुमार यांच्या प्रेरणेने तंत्रस्नेही शिक्ष्ाकांचा एक मोठा गट तयार झाला आहे. प्रत्येक तंत्रस्नेही शिक्षक लोकसहभागातून आपली शाळा तांत्रिक साधनांनी समृध्द करुन डिजीटल म्हणून घोषित करत आहेत. निधी, विद्युत, इंटरनेट यांसारख्या अनेक समस्या असतानाही राज्यातील जवळपास ४७ हजार शाळा डिजीटल झाल्या आहेत. यासाठी शिक्षकांनी २९१ करोड रुपयांचा लोकसहभाग स्वयंस्फुर्तीने घेतला आहे. ठाणे जिल्हयातील पष्टेपाडा या पाडयावरील डिजीटल शाळेपासून सुरु झालेली डिजीटल शाळा ही संकल्पना आज महाराष्ट्रापुरती मर्यादित न राहता डिजीटल शाळा अभियान देशव्यापी झाले आहे. हे परिवर्तन केवळ प्रेरणेनेच शक्य झाले आहे. मा.पतप्रधानांच्या डिजीटल इंडिया या उपक्रमातील हे एक क्रांतिकारी पाऊल आहे.
आज डिजीटल शाळांमध्येच सुरु असणा-या ई-लर्निंग, व्हर्चुअल क्लास, स्मार्ट क्लास, इंटरअॅक्टीव्ह क्लास या सर्वच संकल्पनांमध्येच अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांसमोर शिक्षक नसतील तरी चालेल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. पण खरच तंत्रज्ञान शिक्षकांची जागा घेऊ शकतं का? टेक्नॉलॉजीला विद्यार्थी गुरु मानायला तयार आहेत का? आज गुरुपोर्णिमेच्या निमित्ताने याबाबत केलेली विचारमिमांसा
२०१० साली ठाणे जिल्हयातील पष्टेपाडा या शाळेत शिक्षणसेवक असताना पाटलांकडे असणा-या टिव्हीसमोर मुलांची शाळा भरत असल्याचे पाहून माझ्या मनात चित्रदर्शी शाळेची कल्पना आली. या संदर्भात सर जॉन ड्युई या शिक्षणतज्ञाचे विचार प्रेरणादायी ठरले, “काल शिकवित होतो तसचं आजही शिकवित राहिलो तर आपण आपल्या मुलांपासून त्यांचा भविष्यकाळ हिरावून घेऊ”. मुलांच्या स्क्रीनबद्दलच्या या कुतुहलाला खतपाणी घालण्यासाठी केंद्रप्रमुखांच्या मदतीने एक जुना संगणक मिळवला आणि सुरु झाला डिजीटल शाळेचा प्रवास. प्रि रेकॉर्डेड डिजीटल लर्निंग कंटेन्ट स्क्रीनवर विद्यार्थ्यांना दाखवायला सुरुवात केली. द्रुकश्राव्य ई-लर्निंग सुरु झाले. सुरुवातीला मुलांना आकर्षण वाटले. परंतु नंतर तोच तोचपणा आल्याने ते मुलांना कंटाळवाणं वाटू लागले कारण अध्यापनात फक्त दृश्यात्मकता होती ते परस्परसंवादी नव्हते. त्याचा नेमका परिणाम होतो आहे काय? आणि किती हे त्वरित समजायला मर्यादा होत्या. परंतु कालांतराने लक्षात आले या प्रक्रीयेत शिक्षक पॅसिव्ह होत असून विद्यार्थ्यांशी अंतरक्रिया होत नाही ज्यामुळे विद्यार्थ्यांना मिळणारा अध्ययन अनुभव परिणामकारक नव्हता.
विशेष म्हणजे अंतरक्रिया नसलेली ही दृकश्राव्य पध्दत आज राज्यभरात सर्रास वापरली जाते. फक्त पाहणे व ऐकणे यापलिकडे ई-लर्निंगची व्याख्या केली जात नाही. व्हर्चुअल क्लास या संकल्पनेत तर एका स्टुडिओमधून दिलेली व्याख्या विविध शाळांमध्ये विद्यार्थ्यांना एकाचवेळी वनवे पध्दतीने ऐकविले जाते. यावर्गांमध्ये शिक्षक उपस्थित नसतात. जागतिक संशोधनाचे निष्कर्ष असे दर्शवितात की, आंतरक्रिया असलेल्या शैक्षणिक कृतीच शिक्षणात अधिक परिणामकारक ठरतात. फक्त ऐकणे व पाहणे या आंतरक्रिया नसलेल्या कृती आहेत. मग प्रश्न उभा राहतो की, डिजीटल लर्निंगची हि पध्दत कितपत योग्य आहे ज्यात शिक्षकाची भूमिका नसते.
तंत्रज्ञान हा शिक्षणाचा सर्जनशील मार्ग असला तरी शिक्षक हाच शेवटी या प्रक्रियेचा केंद्रबिंदू आहे. मिळालेल्या माहितीचे विद्यार्थ्यांच्या मानसिकतेनुसार, बुध्यांकानुसार तसेच बोलीभाषेप्रमाणे विश्लेषण करुन विद्यार्थ्यांना शैक्षणिकदृष्या हवे ते योग्य पध्दतीने तोच देऊ शकतो. फक्त गरज आहे तंत्रज्ञानाच्या मर्यादा व शकतीस्थळे ओळखून डिजीटल अध्ययन अध्यापनाची पध्दत विकसित करण्याची.
याच विचारप्रवाहातून कालांतराने पष्टेपाडा शाळेवर तंत्रज्ञानाच्या मदतीने रचनावादी शिक्षणप्रणालीचा अंमल करण्यासाठी आम्ही कृतीयुक्त डिजीटल अध्ययन अध्यापन पध्दती विकसीत केली. यामध्ये माहिती, आवाज, चित्रफिती एकत्रित करुन अत्याधुनिक तांत्रिक साधनांवर स्पर्शपटल तंत्रज्ञानाच्या मदतीने (टचस्क्रिन) विद्यार्थ्यांचा वैयक्तिक प्रतिसाद घेतला जातो. ज्यामध्ये विद्यार्थ्यांना मिळणारा अध्ययन अनुभव अधिक समृध्द व परिणामकारक होता. शिक्षकांच्या भूमिकेला या प्रक्रियेत विशेष महत्त्व असून शिक्षक व विद्यार्थ्याच्या क्रिएटिव्हीटीला प्रचंड वाव असल्याचे लक्षात आले. फळ्याच्या जागी टचस्क्रिन विद्यार्थ्यांच्या हाती पाटीऐवजी टॅब, त्यावर रंजक शैक्षणिक अॅप, इंटरअॅक्टीव्ह मॉनिटर, इंटरअॅक्टीव्ह प्रोजेक्टर, स्मार्टबोर्ड यांसारख्या अत्याधुनिक साधनांनी मुलांना गुंतविले. मुलांचे रंजकतेतून अध्ययन सुरु झाले शाळा त्यांच्या आकर्षणाचा आणि आस्तेचा विषय झाला, मुले त्यात रमली, खेळू लागली, खेळता खेळता शिकू लागली. पष्टेपाडा शाळेवर तंत्रज्ञानावर आधारीत केलेले अनेकविध यशस्वी प्रयोग सोशलमिडीयाच्या माध्यमातून शिक्षकांपर्यंत पोहचविणे, पन्नास हजारांहून अधिक शिक्षकांना डिजीटल तंत्रज्ञानाविषयी प्रत्यक्ष प्रशिक्षण देणे, विद्यार्थ्यांच्या सहभागातून डिजीटल अशी निर्मिती करणे हे सर्व तंत्रज्ञानामुळेच शक्य झाले. तंत्रज्ञानामुळे माझं काम अधिक आकर्षक गतिमान व परिणामकारक होत आहे.
परंतु या सा-या प्रवासात टेक्नॉलॉजीला माझी जागा मी कधीही घेऊ दिली नाही. तर तंत्रज्ञानाच्या मदतीने मी अधिक अपडेट व परिपूर्ण शिक्षक होण्याचा प्रयत्न केला. तंत्रज्ञान केव्हाही शिक्षकाला पर्याय असू शकत नाही. २१ व्या शतकातील शिक्षक म्हणून तुम्हाला अधिक सक्षम बनविणारे हे एक उत्तम साधन आहे. हे साधन आहे साध्य नाही याची सतत जाणीव ठेऊन सर्व शिक्षक मित्रांनी तंत्रज्ञानाचा योग्य नियोजनबध्द व प्रमाणबध्द वापर केला पाहिजे. आज गुरुपोर्णिमेच्या निमित्ताने एक जबाबदार शिक्षक म्हणून गुरुचं स्थान अबाधित ठेऊन गुरु व डिजीटल तंत्रज्ञान यांचा सांगड घालण्याचा प्रयत्न करुया.
संदिप गुंड.
आय.टी.टिचर
डि.आय.ई.सी.पी.डी.पुणे
मो.९२७३४८०६७८