Curriculum
- 21 Sections
- 20 Lessons
- 10 Weeks
- 1. तू बुद्धी दे (10MAR1)2
- 2. संतवाणी (10MAR2)2
- 3. शाल (10MAR3)2
- 4. उपास (10MAR4)2
- 5. दोन दिवस (10MAR5)2
- 6. चुडीवाला (10MAR6)2
- 7. फूटप्रिन्टस (10MAR7)2
- 8. ऊर्जाशक्तीचा जागर (10MAR8)2
- 9. औक्षण भाग (10MAR9)2
- 10. रंग साहित्याचे (10MAR10)2
- 11. जंगल डायरी (10MAR11)2
- 12. रंग मजेचे रंग उदयाचे (10MAR12)2
- 13. हिरवंगार झाडासारखं (कविता) (10MAR13)2
- 14. बीज पेरले गेल (10MAR14)2
- 15. खरा नागरिक (10MAR15)2
- 16. स्वप्न करू साकार (कविता) (10MAR16)2
- मोठे होत असलेल्या मुलांनो... (स्थूलवाचन)1
- जाता अस्ताला (स्थूलवाचन)1
- जगणं कॅक्टसचं (स्थूलवाचन)1
- व्युत्पत्ती कोश (स्थूलवाचन)1
- Question papers4
Assignment (10MAR7)
अभिषेकनं दार उघडलं आणि कामवाल्या रेखामावशी आत आल्या. आल्या आल्या त्यांनी किचनमधील सिंकमध्ये वाट पाहणाऱ्या भांड्यांकडे आपला मोर्चा वळवला. अभिषेकला आज उठायला उशीरच झाला होता. काल त्यांच्याकडे सुमित आला होता कानपूरहून. सुमित म्हणजे अभिषेकचा आतेभाऊ. तो आय. आय. टी. कानपूरला शिकत होता. काल संध्याकाळी सुमित आल्यापासून गप्पांसोबत सुमितच्या लॅपटॉपवर त्यानं केलेले नवे प्रोजेक्ट अभिषेक पाहत होता. त्यामुळे रात्री झोपायला दोन वाजले. ‘‘काय हो हे, तुम्हीच फरशी पुसता आिण तुम्हीच ती घाण करता?’’ हॉलमधून स्नेहलचा आवाज आला. अभिषेक हॉलमध्ये आला तर रेखामावशी फरशी पुसत होत्या; पण मागे त्यांच्या पायाचे काळे मळकट ठसे पुसलेल्या फरशीवर उमटले होते. स्वच्छतेची भोक्ती असलेली स्नेहल त्यामुळे त्रासली होती. रेखामावशीही बिचाऱ्या वरमल्या होत्या.
‘‘अवो, स्नेहाताई, मी कुठं एसीत बसूनशान काम करत्ये बाई. शेनामातीत काम करावं लागतं! आन आमच्या वस्तीचा रस्ता बी समदा उखणलाय. समदी धूळ लागती पायास्नी. आन धा-धा मिन्टाला हातपाय धोयाला येळ बी नाय आन पानी तरी कुठं हाय बक्कळ?’’
‘‘सॉरी, मावशी खरंच सॉरी’’, आपण त्यांच्या मळकट पायांबद्दल बोललो याचं स्नेहललाही कसंतरी वाटलं. तिला टाचेला फाटलेली, अगदी पातळ झालेली त्यांची चप्पल आठवली. रेखामावशीच्या खणखणीत आवाजानं सुमितही जागा झाला आणि हॉलमध्ये आला. सगळा प्रकार त्याच्या लक्षात आला. तेवढ्यात पावडेकाकाही आले. आज बाबा आणि पावडेकाका कुठल्याशा कार्यक्रमाला जाणार होते. स्नेहलने पावडेकाकांना पाणी दिलं. फरशी पुसणाऱ्या रेखामावशींचं लक्ष पावडेकाकांच्या तळव्याकडं गेलं. एकदम गोजिरा, गुलाबी तळवा. कुठं चिरण्या नाहीत की काही नाही! ‘एकदम लोन्यागत पाय हाय काकांचा’, रेखामावशी स्वत:शीच पुटपुटल्या. त्यांनी स्वत:च्या पायाकडं पाह्यलं... पायाला किती तरी चिरण्या पडल्या होत्या.. माती धूळ बसून त्या काळ्या पडल्या होत्या. अभिषेक-स्नेहलचे बाबाही तयार होऊन हॉलमध्ये आले.
‘‘मामा, मी एक ॲप तयार केलं आहे. त्या ॲपच्या साह्यानं आपण कोणाचे पाय किती स्वच्छ आहेत, हे सांगू शकतो’’, सुमितनं सांगितलं.
‘‘सुमित, अरे, पाय स्वच्छ आहेत की नाही, हे सांगायला ॲपची काय गरज आहे? तुम्हां टेक्नोसॅव्ही लोकांना कशाचंही ॲप करण्याशिवाय काही सुचतं की नाही? अरे, सगळ्यात भारी ॲप डोक्याच्या कवटीत आहे, हे विसरलात
की काय तुम्ही लोक?’’ बाबांनी अनाठायी टेक्नॉलॉजीबद्दलची आपली मळमळ व्यक्त केली.
‘‘मामा, गंमत तर बघ तू माझ्या ॲपची...त्याचं नाव आहे फूटप्रिन्टस’’, असं म्हणत सुमितनं आपला स्मार्टफोन काढला.
‘‘सुरुवात करूया रेखामावशींपासून. ज्यांच्या पायाबद्दल स्नेहलदीदीनं नोंदवला होता आक्षेप...!’’ स्नेहलचा चेहरा पडला. तिला स्वत:चाच राग आला. सुमितनं आपल्या एँड्रॉईड मोबाईलमधलं ॲप उघडलं आणि रेखामावशींना काही प्रश्न विचारायला सुरुवात केली.
‘‘मावशी, तुम्ही राहता कुठं?’’
‘‘त्या टेकडीपल्याड’’, मावशी म्हणाल्या.
‘‘इथून किती कि. मी. आहे?’’
‘‘तीन.’’
‘‘तुम्ही कशा आलात इथपर्यंत?’’
‘‘गेल्या मयन्यापतूर चालतच येत हुते; पन आता माज्या लेकानं एक सायकल दिलीया मला. तवा आता सायकलनं येते’’, अशी अजून बरीच माहिती त्यानं भरली. आठवड्यातून सरासरी किती किलोमीटर फिरती होते? ही फिरस्ती तुम्ही कशी करता? आतापर्यंत किती झाडं तुम्ही लावली आहेत? रेखामावशी फिरायच्या पायीच, कधीतरी सायकलनं! त्यांच्या इवल्याशा झोपडीपुढंही त्यांनी दोन झाडं लावली होती. त्यांतलं एक लिंबोणीचं होतं; पण एवढी सगळी माहिती सुमित का घेतोय, तेच कुणाला कळेना. रेखामावशी तर फार गडबडून गेल्या. ‘‘आणि आता पाहा, या आहेत रेखामावशींच्या फूटप्रिन्टस...! असं म्हणत त्यानं मोबाईलचं कसलंसं बटन दाबलं आणि स्क्रीनवर पायपुसणीच्या आकाराचा एक निळा चौकोन उमटला, अगदी आभाळाच्या निरभ्र तुकड्यासारखा! सगळे ‘आ’ वासून पाहत होते आणि त्या निळ्या तुकड्याच्या मधोमध दोन पावलं उमटली...एकदम चंदेरी वर्खात मढलेली आणि खाली इंग्रजीत शब्द उमटले...‘सिल्व्हर फूटप्रिन्टस! दिमोस्ट क्लिन फूटप्रिन्टस!!’
‘‘वाऽ पाह्यलंत रेखामावशीचे पाय चंदेरी आहेत. एकदम स्वच्छ. झऱ्याच्या स्फटिक स्वच्छ पाण्यासारखे’’, सुमित ओरडला. ‘‘ह्याऽ हे भलतंच!’’ रेखामावशींच्या पायाकडे पाहत पावडेकाका म्हणाले.
सुमितनं हलकेच पावडेकाकांच्या गोजिऱ्या तळव्यांकडे पाहिले आणि म्हणाला, ‘‘काका, आपण तुमच्या पायाचं पाहूया का?’’
‘‘त्यात पाह्यचं काय? हे बघ, माझे पाय किती स्वच्छ आणि मऊसूत आहेत...!’’ पावडेकाका पाय सगळ्यांना दाखवत म्हणाले. ‘‘पण चला काय सांगतंय तुमचं ॲप, ते तरी पाहूया’’, त्यांनी पुस्ती जोडली. सुमितनं पावडेकाकांचा डेटा ॲपमध्ये भरायला सुरू केला.
‘‘काका, आता तुम्ही कुठून आलात?’’
‘‘विश्रांतवाडीहून.’’
‘‘कसे?’’
‘‘अर्थातच, कारने.’’
‘‘वीस किलोमीटर कारने. तुम्ही एकटेच...!’ सुमितची शंका
‘‘हो, का?’’
‘‘अच्छा, पण काका आठवड्यातून तुमचं फिरणं किती होतं?’’
‘‘अरे, माझं ऑफिसच माझ्या घरापासून १६ किलोमीटर आहे. रोजचे पस्तीस-चाळीस किलोमीटर तर नक्कीच होतात.’’
‘‘आणि हे सगळं कारनं... तुम्ही एकटेच ये-जा करता?’’
‘‘हो, नाही तर काय बसला लटकत जाऊ म्हणतोस?’’, काका चिडून म्हणाले.
‘‘काका, तुम्ही काही झाडं लावली आहेत का?’’
‘‘पावडेकाकूंनी कुंडीतल्या रोपांकरिता माती मागितली तर ती आणून देणं होत नाही काकांना, ते झाडं काय लावणार?’’ स्नेहलनं एकदम स्ट्रेट ड्राईव्ह लगावला. सुमितनं पावडेकाकांची आणखी काही माहिती घेतली आणि ॲपवर भरली. पुन्हा निळा तुकडा चमकला आणि काही क्षणांतच त्या निळ्या तुकड्यावर पावडेकाकांची पावलं उमटली.
दोन काळीकुट्ट पाऊलचिन्हे!!
आणि खाली शब्द आले
‘सॉरी, यू हॅव डर्टीएस्ट फूटप्रिन्टस. परफेक्ट ब्लॅक फूटप्रिन्टस.’ पावडेकाकांचा चेहरा एकदम पडला. ‘‘काय नाटक आहे हे? असल्या व्हर्च्युअल गोष्टी नका सांगू मला’’, पावडेकाका रागाने म्हणाले. सुमितनं त्यांच्या नाराज चेहऱ्याकडं पाहिलं आणि तो समजावणीच्या सुरात म्हणाला, ‘‘माफ करा, काका; पण ही पावलं व्हर्च्युअल नाहीत, उलटपक्षी ती अधिक खरीखुरी आहेत. काका, हे ॲप आपल्या दैनंदिन व्यवहारात आपण किती कार्बन वातावरणात सोडतो, हे मोजतं. थोडक्यात आपल्या जीवनशैलीतून उमटणाऱ्या आपल्या कार्बन प्रिन्टस रेखाटतं. त्या आपल्याला उघड्या डोळ्यांना दिसत नाहीत. आता तुम्ही वीस कि. मी. अंतर तुमच्या कारनं येता, तेव्हा तुम्ही किमान एक लीटर पेट्रोल जाळता म्हणजेच त्याच्या दुपटीहून अधिक कार्बन डायॉक्साईड वातावरणात सोडता!’’
‘‘काहीतरीच! मला नाही पटत’’, काका म्हणाले.
‘‘काका, हे एक शास्त्रीय सत्य आहे. तुमच्या कार्बन सोडण्याच्या प्रमाणावरून तुमच्या पावलांचा काळा रंग ठरतो. रेखामावशींच्या रोजच्या जगण्यात कार्बन उत्सर्जनाला वावच नाही, म्हणून तर त्यांची पावलं आपल्यापेक्षा अधिक सुंदर, चंदेरी आहेत’’, सुमित बोलत होता. ‘‘बापरे, आपण फरशी घाण होण्याची गोष्ट करतो; पण आपण तर अवघं वातावरणच घाण, प्रदूषित करत असतो. किती प्रचंड कार्बन चिकटलेला असतो, आपल्या पायांना! ग्लोबल वॉर्मिंगला हातभार लावतो आपण. तापानं फणफणलीय आपली धरती, आपल्या पायाला चिकटलेला हा कार्बन आपल्याला धुवायला हवा. मी ठरवलंय, मी कॉलेजला जाताना सायकल वापरणार. मला माझे पाय रेखामावशींसारखे चंदेरी हवेत’’, स्नेहल गहिवरून म्हणाली.
अभिषेक भारावून म्हणाला, ‘‘माझ्या तर कॉलेजसमोरच बसस्टॉप आहे. आजपासून मी बसनंच ये-जा करणार. ठरलं एकदम!’’
‘‘खरंय पोरांनो, आजकाल चालणं, सायकल वापरणं विसरूनच गेलोय आपण. अगदी कोपऱ्यावरून भाजी जरी आणायची असली तरी आपण बाईकला किक मारतो आणि पुन्हा व्यायामाकरिता वेगळं मॉर्निंग वॉकचं नाटक करतो. बसनं प्रवास करणं तर आपल्याला कमीपणाचं वाटतं; पण आपल्या पायांना चिकटलेला कार्बन प्रमाणात ठेवण्याकरिता पब्लिक ट्रान्सपोर्ट इज अ मस्ट’’, अभिषेकचे बाबा म्हणाले.
रेखामावशी सगळ्यांचं बोलणं लक्ष देऊन ऐकत होत्या. बोलता बोलता हलकेच त्यांनी आपल्या पायाचे फरशीवरचे ठसे ओल्या फडक्याने पुसून घेतले.
‘‘पाह्यलंत, किती सहजपणे पुसले आपल्या मळलेल्या पायांचे ठसे रेखामावशींनी’’, सुमित म्हणाला.
‘‘पण आपल्या पायांचे वातावरणावर उमटलेले ठसे मात्र, आपल्याला इतक्या सहजतेने नाही बरं पुसता येणार. त्या करता आपल्याला झाडं लावावी लागतील... या हिरव्यागर्द झाडांनी आपली काळीकुट्ट पावलं थोडी तरी उजळ होतील’’, सुमित भरभरून बोलत होता. ‘‘हो ना, नाही तर आपण तसेच धावत राहू. मळलेल्या पायांची माणसं बनून!’’ पावडेकाका बोलले आणि त्या निळ्याशार तुकड्यावर चांदणं उमलल्याचा त्यांना भास झाला.
Complete all the assignments given below in your fair notebook. The solutions / Answer set is given for your reference. Do not copy the answers directly without understanding.
These assignments will be considered for Internal Evaluation