ही पिसे कोणाची? (5MAR4)
मिनूचे घर शेतात होते. ती खेळता खेळता घरापासून खूप दूर आली. तिला दोन पिसे दिसली. तिने ती पिसे उचलली. तिला ती पिसे खूप आवडली.
तिला वाटेत एक कोंबडी दिसली. मिनूला वाटले, ही पिसे नक्कीच कोंबडीची असणार, म्हणून तिने कोंबडीला विचारले, “’कोंबडीताई, कोंबडीताई ही पिसं तुझी आहेत का?”
कोंबडीने पिसांकडे निरखून पाहिले. “नाही गं बाई, ही पिसं माझी नाहीत,” असे म्हणून कोंबडी खुराड्यात जाऊन बसली.
“कोणाची आहेत बरं ही पिसं ?’ असे म्हणत मिनू एका झाडाजवळ आली. तिला झाडावर पांढर््या-
करड्या रंगाचे एक कबुतर दिसले. त्याला पाहून मिनूला वाटले, याची तर नाहीत ही पिसं?’ तिने कबुतराला विचारले, “कबुतरदादा, कबुतरदादा ही पिसं तुझी आहेत का?” कबुतर म्हणाले, “नाही गं बाई, ही पिसं माझी नाहीत.”
“कोणाची आहेत बरं ही पिसं?’ या विचारात मिनू पुढे निघाली. समोरून आपला पिसारा सावरत मोर येत होता.
त्याची ऐटदार चाल आणि रंगीबेरंगी लांबसडक पिसारा खूप मोहक दिसत होता. तिने आपल्या हातातील पिसे निरखून बघितली. ही पिसे नक्कीच मोराची नाहीत, हे तिला जाणवले. तरीही तिने मोराला विचारले, “अरे मोरा, ही पिसं कोणाची आहेत, हे तुला माहीत आहे का?” मोराने पिसांचे निरीक्षण केले. तो म्हणाला, ““ही तर बदकाची आहेत.”
मिनूला खूप आनंद झाला. तिने मोराला विचारले, “मला बदक कोठे भेटेल?” मोराने बदकाचा पत्ता सांगितला. त्याचे आभार मानून मिनू पळतच नदीवर आली. नदीकिनारी दाट झाडी होती. तिने बदकाला हाक मारली.
बदक झाडीतून बाहेर आले. मिनूने त्याच्यासमोर हातातील पिसे धरली आणि त्याला म्हणाली, “ही तुझी पिसं मला सापडली आहेत. मी तुला शोधत होते. ही घे तुझी पिसं.”