आम्ही हवे आहोत का? (8MAR10)
मुंबईच्या परळ भागात एक इस्पितळ आहे. ते आहे जनावरांचं इस्पितळ. ते आतून बघायचं असं माझ्या मनात खूप दिवसांपासून होतं. एकदा तो योग आला. कमानीच्या आत तर सहज प्रवेश मिळाला. उजवीकडं एक छोटीशी इमारत दिसते. हे बहुधा कार्यालय असावं. कार्यालयाच्या दाराशीच भिंतीवर एक मोठी तसबीर आहे. त्या तसबिरीत बैल, घोडा, कुत्रा, मांजर, शेळी अशी वेगवेगळ्या जनावरांची चित्रं आहेत. खाली एक छोटंसं पण मनाला भिडणारं वाक्य आहे, ‘आम्हांला तुमची गरज आहे; तुम्हांला आम्ही हवे आहोत का?’
माणसाच्या दयाबुद्धीला, करुणेला मुक्या प्राण्यांनी केलेलं ते आवाहन होतं. मला आत कुठंतरी हालवून सोडतं. आता मी कार्यालयात पाऊल टाकते. समोरच्या कपाटावर उदी रंगाचा एक गलेलठ्ठ बोका मजेत आपल्या मिशा साफ करत बसला आहे. मला बघताच तो कपाटावरून उडी मारतो आणि साहेबांच्या टेबलावर येऊन बसतो.
इस्पितळ बघण्यासाठी मी आले आहे, असं मी त्या साहेबांना सांगते. बोक्याचं डोकं कुरवाळत ते माझं ऐकून घेतात आणि लगेच मला परवानगी देऊन टाकतात. इतकंच नाही, तर मला सारं इस्पितळ नीट दाखवण्यासाठी भरत नावाचा एक छोटा चुणचुणीत मुलगाही ते माझ्याबरोबर देतात.
आम्ही पुढं जाऊन डावीकडं वळतो. एवढ्यात भरत मला म्हणतो, ‘‘बाई, हा मांजरांचा विभाग बघायचाय?’’ मांजरांचा विभाग म्हटल्यावर मी उत्सुकतेनं आत पाऊल टाकते. एक लहानशी पण स्वच्छ खोली. आपल्या स्वयंपाकघरातले ओटे जेवढ्या उंचीचे असतात तेवढ्या उंचीचे कट्टे आणि त्यांच्याखाली एकेरी जाळीने विभागलेले छोटे छोटे खण. बाहेरच्या बाजूनंही या खणांना जाळ्या बसवलेल्या आहेत. प्रत्येक खोलीत एक एक पेशंट आहे.
एक भलाथोरला काळाभोर बोका आपल्या हिरव्या डोळ्यांनी व्याकूळ नजरेनं बघत आहे. एक चिमुकलं कबरं पिलू कावरंबावरं झालं आहे. एक मांजरी चिडलेल्या वाघिणीसारखी पिंजऱ्यात इकडूनतिकडं फेऱ्या मारत आहे. एक ठिपक्याठिपक्यांचं मांजर आपण पेशंट आहोत हे विसरून मार्जारजातीच्या स्वच्छतेच्या आवडीनुसार आपल्या पंजानं तोंड, मिशा, डोळे पुसून साफ करत आहे. एक मांजर खूप आजारी असावं; कारण त डोळे मिटून पुढल्या दोन पंजांवर तोंड ठेवून गप पडलं आहे. प्रत्येक मांजराजवळ दोन बशा आहेत. एक खाद्यपदार्थासाठी व दुसरी पाण्याची. प्रत्येकाजवळ त्याच्या प्रकृतीतले चढउतार दाखवणारा तक्ता भिंतीवर लावला आहे. प्रत्येकाला बसायला मऊ अंथरुण आहे.
मी आणि भरत खोलीत पाऊल टाकतो मात्र, सारी मांजरं चमकतात. त्यांच्या डोळ्यांत आतुरता काठोकाठ भरली आहे. काही मांजरं जाळीवर नाक घासू लागतात. काही नखांनी जाळ्या खरवडू लागतात. ‘मियाँव, मियाँव, मियाँव’, कोवळ्या, निबर, भरीव, किनऱ्या आवाजांचा एकच कलकलाट सुरू होतो. प्रत्येक मांजर आपापल्या परीनं माझं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करत आहे. प्रत्येकजण जणू म्हणत आहे, ‘मला इथं फार एकटं वाटतंय. जरा माझ्याकडं या हो. मला कुरवाळा.’
मी जाळीच्या छिद्रांतून बोटं घालून कुणाचं डोकं खाजवते, कुणाचा गळा खाजवते तर कुणाचे कान कुरवाळते. मांजरं खूष होतात. पोटांतून ‘गुर्रगुर्र’ आवाज काढून समाधानाची पावती देतात. आता माझं लक्ष एका गोष्टीकडं जातं. प्रत्येक मांजराच्या कप्प्यामध्ये त्याचं नाव लिहिलेलं आहे. ‘जॅक जाधव’, ‘बकुल गोखले’, ‘सॅमी डिकुन्हा’, ‘रोमल टिपणीस’. जाधव, गोखले, डिकुन्हा, टिपणीस! माझ्या ध्यानात येतं, ही आहेत मांजरांना दिलेली त्यांच्या मालकांची आडनावं!
त्या जाधव, गोखले, टिपणीस इत्यादी मंडळींचा डोळ्यांनी निरोप घेऊन मी बाहेर पडते. मला निरोप देताना पुन्हा एकदा ‘मियाँव’चा गजर होतो. भेटीला आलेला माणूस परत जायला निघाला म्हणजे इस्पितळाच्या पेशंटच्या चेहऱ्यावर जी खिन्नता दिसते, तीच या मांजरांच्या चेहऱ्यावर मला दिसली. घरी लाड करून घ्यायची सवय झालेल्या या मांजरांना इथं विलक्षण एकटं एकटं वाटत असलं पाहिजे.
‘‘या मांजरांना औषधपाणी माणसांसारखं करतात का रे?’’ मी भरतला विचारलं.
‘‘तर तर!’’ असं म्हणून भरत सांगतो, ‘‘त्यांचं खाणंपिणं पथ्याचं असतं, बाई.’’ एकदम भरतला काहीतरी आठवतं. तो मला म्हणतो, ‘‘बाई, शेजारी कुत्र्यांचा विभाग आहे, तिथं जाऊ या जरा.’’
आम्ही शेजारच्या विभागात जातो. बघते, तर खरंच एक भली दांडगी अतिशय देखणी कुत्री तिथं निजलेली दिसली. जवळच एका टोपलीत तिची बरीच पिलं आहेत. अजून डोळेही न उघडलेल्या त्या पिलांच्या अंगांवरून मी हलकेच बोटं फिरवते. त्यांची आई तपकिरी रंगाची आहे; पण पिलं पांढरी. काही ठिपक्याठिपक्यांची आहेत. सावरीच्या कापसाचे जणू मऊमऊ गोळेच! इवले कान, इवल्या शेपट्या, लालसर ओली नाकं आणि पोटांतून येणारा ‘कुई कुई’ आवाज. कितीतरी वेळ मी त्यांच्याकडं बघतच राहिले.
तिथून पुढं गेल्यावर कुत्र्यांचा आणखी एक विभाग लागला. इथं तऱ्हेतऱ्हेची कुत्री आहेत. लठ्ठ आणि रोड. चिडकी आणि शांत. साखळीला सारखे हिसके देऊन काही सुटू बघण्याचा प्रयत्न करणारी, तर काही स्वस्थ बसून राहिलेली.
एका कुत्र्याच्या कानामागं मोठं गळू झालं आहे. एकाचा मोडलेला पाय प्लॅस्टरमध्ये घालून ठेवला आहे. एक कुत्रा चिडून माझ्या अंगावर झेप घेऊ बघतो. मी दचकून मागं सरकते. भरत त्याच्यावर खेकसतो, ‘‘झेन्या, चूप! असं नाही करायचं. आपल्या पाहुण्या आहेत त्या. चूप!’’
झेन्या जणू समजल्यासारखा चूप बसतो.
दुसरा एक कुत्रा सारखा झेप घेऊ लागतो; पण तो अंगावर तुटून पडण्यासाठी नव्हे. तो पुढचे दोन्ही पंजे जुळवून मला नमस्कार करतो. झेन्या रागीट, तर हा एकदम सालस. भरत मला म्हणतो, ‘‘आल्या-गेल्या सर्व लोकांना तो असा नमस्कार करतो बाई.’’
मी भरतला विचारते, ‘‘इथं आणखी कोणते प्राणी येतात रे?’’
‘‘पुष्कळ येतात बाई,’’ भरत सांगू लागतो, ‘‘शेळ्या येतात. मेंढ्या, ससे येतात. माकडं येतात.’’
आम्ही बोलतो आहोत, एवढ्यात माझ्या पायांजवळून एक मांजरी चाललेली िदसते. भरत मला म्हणतो, ‘‘हात लावा बाई तिला.’’
मी तिच्या पाठीवर हात ठेवते. मांजरीचं सर्वांग शहारतं. मग ती सावरते. माझ्याजवळ येते. मी तिला थोपटते, तशी ती प्रेमानं ‘गुर्रगुर्र’ करू लागते. मी भरतला विचारते, ‘‘ही अशी दचकली कशी रे?’’
भरत सांगतो, ‘‘जन्मापासून आंधळी आहे ती! तुमचा अनोळखी हात म्हणून घाबरली. इथंच जन्मलेलं हे पोर. जन्मापासून ठार आंधळं. डोळे बघाल तर अगदी लख्ख आहेत; पण दिसत मात्र नाही हं. आम्ही हे पिलू पाळलं. आता मोठी मांजरी झाली आहे. इथं ती सगळ्यांना ओळखते. विश्वासानं वावरते. आम्ही तिला बाहेर सोडत नाही. ितथं बिचारीचा कुठं निभाव लागेल?’’
हे सारं पाहून मी बाहेर आले. एक वेगळंच जग पाहिलं असं वाटलं! का कुणास ठाऊक, आत िशरताना जे वाक्य वाचलं होतं, ते पुन्हा पुन्हा डोळ्यांपुढे येत होतं- ‘आम्हांला तुमची गरज आहे;