गिर्यारोहणाचा अनुभव (8MAR8)
शाळेला सुट्टी लागणार होती. ईशान विचार करत होता, की ही सुट्टी कशी घालवायची? व्हिडिओ गेम खेळून त्याला कंटाळा आला होता. मित्रांबरोबर रोज क्रिकेट, फुटबॉल आणि बॅडमिंटनही खेळता येऊ शकणार होते. शिवाय त्याच त्याच रोमांचक कथा वाचण्यात त्याला विशेष गोडी नव्हती.
ईशान विचार करू लागला, या वेळी सुट्टीमध्ये काहीतरी नवीन करावे. काहीतरी असे केले पाहिजे, की सर्व कंटाळा नाहीसा होईल; परंतु बराच विचार करूनही त्याला सुट्टी घालवण्याचा योग्य पर्याय सापडत नव्हता. तेवढ्यात त्याला दिलासा मिळणारी घटना घडली. त्याला उत्तर काशीच्या गिर्यारोहण संस्थेकडून आपल्या कॉम्प्युटरवर एक ई-मेल प्राप्त झाला. तोच ईशानच्या मित्रांनाही पाठवण्यात आला होता. गिर्यारोहण संस्थेने त्यांना आपल्या एका मोहिमेमध्ये सहभागी होण्याचे निमंत्रण पाठवले होते.
वास्तविक ईशानला गिर्यारोहणाचा विशेष छंद होता. गिर्यारोहण आता त्याचा छंद राहिला नव्हता, तर त्याचे त्याला वेड लागले होते. त्याने आपल्या शहरातील एका प्रसिद्ध गिर्यारोहण संस्थेत आधीच प्रवेश घेतला होता आणि उत्कृष्ट प्रशिक्षणातून त्याला गिर्यारोहणातील बऱ्याच बारीकसारीक गोष्टी समजल्या होत्या. त्याचे अनेक मित्रही याच संस्थेत गिर्यारोहण शिकत होते आणि त्यांनी ईशानबरोबर पहाडावर अनेक प्रशिक्षण कार्यक्रमांत भाग घेतला होता.
गिर्यारोहणाचा अनुभव खरोखर रोमांचक होता. आकाशाला स्पर्श करणारे उंच पहाड, विशालकाय खडक, हिरव्यागार घाटी आणि वेगाने वाहणाऱ् स्वच्छ पाण्याच्या पहाडी नद्या ईशान आणि त्याच्या साथीदारांना साद घालत होत्या. त्यांना जेव्हा संधी मिळेल, तेव्हा ते आवश्यक उपकरणे आणि सामानाची बॅग घेऊन गिर्यारोहण करायला जात असत.
उत्तर काशीच्या गिर्यारोहण संस्थेचा संदेश वाचल्यावर ईशान फारच खूश झाला. त्याने लगेच या निमंत्रणाची माहिती आपले मित्र धैर्य, प्रशांत, अमन आणि सक्षम यांना दिली. सर्वच मित्र फार खूश झाले. ते जणू सुट्टीत पहाडावर जाण्याची वाटच पाहत होते. शाळेला सुट्टी लागण्यापूर्वीच त्यांनी पहाडावर जाण्याची तयारी सुरू केली होती.
शाळेला सुट्टी लागल्याबरोबर सर्व मित्र टॅक्सीने ऋषिकेशहून उत्तर काशीला पोहोचले. वाटेत उंच उंच पहाड पाहून ते फार रोमांचित झाले होते.
गिर्यारोहण संस्थेच्या आपल्या साथीदारांना भेटल्यावर ईशान आणि त्याचे मित्र खूप उत्साहित झाले होते. सर्व मित्रांनी मिळून माऊंटेनिअरिंगच्या साहाय्याने उत्तर काशीहून गंगोत्रीला जाण्याचा निश्चय केला.
गिर्यारोहण सुरू झाले. उंच पहाडावर गिर्यारोहण करणे काही सोपे काम नव्हते. अनेक तासांच्या कठीण आणि थकवणाऱ्या चढाईनंतर शेवटी ते गंगोत्रीला पोहोचले. ईशान आणि त्याचे साथीदार गंगोत्रीला पोहोचल्यामुळे फार उत्साहित झाले होते आणि ते आपला सर्व थकवा विसरून गेले होते; परंतु गंगोत्रीला पोहोचल्यानंतर त्यांनी जे पाहिले, ते काळजाला घर पाडणारे दृश्य होते. पहाडामधून आलेले ढग अकस्मात फुटले आणि गंगोत्रीवर भीषण हाहाकार माजला होता. पाण्याच्या धोकादायक प्रवाहामुळे मंदिर परिसरच नव्हे, तर दुकाने, हॉटेल्स आणि धर्मशाळा उद्ध्वस्त करून टाकल्या होत्या. बरीच घरे आणि गेस्ट हाऊस नदीच्या वेगवान प्रवाहाबरोबर वाहून गेले हाेते. या भीषण तांडवामध्ये बरेच लोक मृत्युमुखी पडले होते. नदीने रौद्र रूप धारण केले होते.
या तांडवात आपल्या आप्तेष्टांना गमावल्यामुळे लोक स्फुंदून स्फुंदून रडत होते. भूस्खलन झाल्यामुळे ठिकठिकाणी अनेक तीर्थयात्री अडकले होते. ते बिचारे चारधाम यात्रा करायला निघाले होते; परंतु येथे त्यांना सर्वस्व गमवावे लागले होते. ईशान आणि त्याच्या साथीदारांनी पहाडावर हे सर्व पाहिले, तेव्हा त्यांच्या अंगावर काटे आले आणि गिर्यारोहणाचा सर्व उत्साहच नाहीसा झाला. ईशान आणि त्याचे साथीदार ही परिस्थिती मूकपणे पाहू शकत नव्हते.
अचानक तेथे भुकेने व्याकूळ झालेल्या एका मुलाने आपल्या वडिलांकडे बिस्किटांची मागणी केलेली ईशानने पाहिले. वडिलांनी जेव्हा दुकानदाराला बिस्किट पुड्याची किंमत विचारली तेव्हा तो म्हणाला, ‘‘बिस्किटांचा एक पुडा शंभर रुपयांना मिळेल आणि पाण्याची बाटली दोनशे रुपयांना मिळेल.’’
दुसरा एक हॉटेलमालक जेवणाच्या थाळीची किंमत दोन हजार रुपये वसूल करत होता. दुकानदारांची ही मनमानी पाहून ईशान आणि त्याचे साथीदार हैराण झाले होते. ते विरोध करत दुकानदाराला म्हणाले, ‘‘काका, ही तर सरळ लूटमार आहे. पाच रुपयांत मिळणाऱ्या बिस्किट पुड्याची किंमत शंभर रुपये आणि पंधरा रुपयांच्या पाण्याच्या बाटलीची किंमत दोनशे रुपये कशी काय असू शकते?’’
‘‘मुलांनो, तुम्ही आपले काम करा. येथे पहाडावर वस्तूयाच भावाने मिळतात. ज्याला गरज वाटेल, तो खरेदी करेल,’’ दुकानदार रागाने म्हणाला.
ईशान आणि त्याचे साथीदार गप्प बसले. त्यांनी अडचणीत सापडलेल्या यात्रेकरूंना मदत केली. जखमी यात्रेकरूंवर प्रथमोपचार केले. त्यांची मलमपट्टी केली आणि अौषधे दिली. हरवलेल्या यात्रेकरूंचा शोध घेण्यासाठी त्यांनी मदत केली आणि भुकेल्या मुलांना आपल्याबरोबर आणलेली फळे, बिस्किटे व पाण्याच्या बाटल्या दिल्या.
संध्याकाळ झाली होती. ईशानला आता खूप भूक लागली होती. त्याच्या साथीदारांनाही भूक लागली होती. त्यांना विश्रांतीची गरज जाणवत होती. पहाडाच्या कडेला एक हॉटेलसारखे घर दिसल्यावर ते मोठ्या आशेने घरमालकाकडे गेले आणि म्हणाले, ‘‘काका, आम्हांला खाण्यासाठी थोडे अन्न आणि रात्रभर मुक्काम करण्यासाठी एखादी खोली देऊ शकाल?’’
‘‘हो, परंतु जेवणासाठी दहा हजार आणि खोलीचे भाडे पंधरा हजार रुपये द्यावे लागेल,’’ दुकानदार काहीशा रुक्ष स्वरात म्हणाला.
ते ऐकून ईशान म्हणाला, ‘‘परंतु काका, जेवणाची ही किंमत आणि खोलीचे भाडे फार जास्त आहे.’’
‘‘मुला, जीव वाचवण्यासाठी ही किंमत तर काहीच नाही. जरा विचार कर, जर भूक लागल्यावर तुम्हांला जेवण मिळाले नाही आणि रात्रभर खुल्या आकाशाखाली झोपावे लागले, तर तुमचे काय हाल होतील?’’
तेवढ्यात अचानक मोठा आवाज झाला. ईशान आणि त्याचे साथीदार आपापसात विचारविनिमय करत होते, अचानक पहाडावरील एक घर मोठा आवाज होऊन खाली कोसळले. सर्वजण पडलेल्या घरात दाबले गेले.
ईशान आणि त्याचे साथीदार सर्व काही विसरून कामाला लागले. घरात राहणारे लोक देवदारच्या झाडात अडकले होते. ईशानला अशा परिस्थितीचा चांगला अनुभव होता. त्याने गिर्यारोहण संस्थेत पहाडावरून खाली पडलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे खास प्रशिक्षण घेतले होते. तो जाड व मजबूत दोराच्या साहाय्याने खाली उतरला आणि अडकलेल्या त्या सर्वांना बाहेर काढले.
ईशान व त्याच्या साथीदारांना ती रात्र पहाडावर घालवावी लागली. त्यांनी आपल्याबरोबर नायलॉनचा तंबू आणला होता. त्या आधुनिक तंबूत त्यांची कोणतीही गैरसोय झाली नाही. पहाडावर झालेल्या या दुर्घटनेची माहिती सेनेला मिळाली होती आणि हवाईदलाच्या हेलिकॉप्टरने ‘बचाव अभियान’ सुरूही केले होते.
सकाळ झाल्यावर ईशानने व त्याच्या मित्रांनी आसपासच्या जंगलातून लाकडे गोळा करून आणली व त्यांना आग लावली. त्यातून खूप धूर झाला. हा हवाईदलाच्या हेलिकॉप्टरसाठी एक संकेत होता. योगायोगाने एक हेलिकॉप्टर धूर पाहून खाली आले व पहाडाच्या वर घिरट्या घालू लागले. हवाईदलाच्या जवानांनी पहाडावर अडकलेल्या यात्रेकरूंना, ईशान व त्याच्या साथीदारांना पाहिले. ईशान व त्याच्या साथीदारांनी यात्रेकरूंना हेलिकॉप्टरपर्यंत पोहोचवायला हवाई दलाच्जवानांना मदत केली.
हवाईदलाच्या हेलिकॉप्टरने सर्वांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवले होते. हवाईदलाच्या अधिकाऱ्यांना जेव्हा ईशान व त्याच्या साथीदारांचे बहादुरीचे कार्य समजले, तेव्हा त्यांनी सर्वांची प्रशंसा केली. एवढेच नव्हे, तर त्यांनी या मुलांना वीरपदक मिळावे म्हणून राष्ट्रपतींकडे शिफारस केली. तिकडे ईशान आणि त्याचे साथीदार पहाडावर झालेल्या दुर्घटनेनंतर सुरक्षित घरी पोहोचले, तेव्हा ते फार खूश झाले होते. गिर्यारोहणाचा हा अनुभव त्यांच्यासाठी कायम स्मरणात राहणारा होता.