घाटात घाट वरंधाघाट (8MAR5)
ज्येष्ठ महिना सुरू झाला, की पावसाचे वेध लागतात. सोसाट्याचा वारा आणि पहिल्या पावसाच्या सरींची वार्ता पसरवणारा मातीचा सुगंध हे अगदी प्रत्येक वर्षी येतच असतं. तरीही ते दरवेळी नवीन वाटतं. बालपणी बेफाम होऊन ‘ये गं ये गं सरी, माझे मडके भरी’च्या तालावर पावसात चिंब चिंब भिजणं आणि त्याबद्दल आई-वडिलांकडून पोटभर मार खाणं. आजी-आजोबांकडून कागदी होड्या करायला शिकून त्या पावसाच्या पाण्यात सोडण्यासाठी पुन्हा पावसाची आतुरतेने वाट पाहणं. अशा कितीतरी आठवणी घेऊन दरवर्षी पाऊस येत असतो; पण मोठं झाल्यावर इंद्रधनुष्यात उमलणाऱ्या रंगांचे अर्थ उमगू लागतात. बरसण्याचा अर्थ कळू लागतो आणि हुरहूर, तळमळ अशा शब्दांचा थेट प्रत्यय येऊ लागतो. पावसाच्या आगमनाने गतकाळातले ‘‘ते क्षण’’ पुन्हा जिवंत होतात. डोळ्यांसमोर येऊ लागतात आणि कधी कधी पापण्यांमधून अलगदपणे वाहूनही जातात. मग डोळ्यांतला कोणता आणि बाहेरचा कोणता तेच कळत नाही. असं बरंच काही अनुभवायचं असेल तर वरंधा घाट गाठलाच पाहिजे.
पुण्याहून महाडकडे जाताना हिरव्या हिरव्या रंगाची झाडे पाहत पाहत, पावसाळ्यातले टिपिकल पावसाळी कुंद वातावरण एन्जॉय करत करत प्रवास सुरू असतो. तो बंदिस्त गाडीत सुक्याने करण्यात जितकी मजा असते त्याहीपेक्षा जास्त दोन चाकीवर अंग भिजवत करण्यात असते. पावसाचं पाणी अंगावर घेत आणि रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्यांच्या अंगावर उडवत, बेफाम वारा छातीवर झेलत, आवडती गाणी गुणगुणत पावसाळी प्रवास करण्यातली मजा तर काही औरच असते. असा शरीर गारठवणारा आणि मनाला उभारी देणारा प्रवास कधी संपूच नये असे वाटते; पण पाहता पाहता मैलांचे दगड मागे पडत जातात आणि आपण येऊन पोहोचतो ते वरंधा घाटात. घाटात घाट वरंधा घाट, बाकी सब घाटीयाँ! असे इथे आल्यावर वाटते. पाण्यावर झुकलेल्या हिरव्यागच्च झाडीतून रोरावत बाहेर येणारे धबधबे, दरीतलं हिरवं रान, ढगाळलेले डोंगर, पावसाची संततधार, मोठमोठ्या दगडांवर आसूड मारत धावत खळाळत वाहणारे पाणी, असे निसर्गाचे विहंगम दृश्य डोळ्यांसमोर येते अन् नजरेचे पारणे फेडून जाते. त्या पावसाळी वातावरणात भजी-वडे-चहा असा चमचमीत मेनू मजबूत चापायला वरंधा घाटातल्या टपऱ्यांसारखी दुसरी जागा नाही. श्री वाघजाईच्या सोबतीने उभारलेल्या टपऱ्यांमधून हा राजेशाही खाना अगदी ताजा ताजा तयार केला जातो. गरमागरम कांदाभजी, आलं लसूण घालून तळलेला गरमागरम बटाटेवडा आणि सोबत वाफाळलेलाचहा. बाहेर बरसणाऱ्या पावसाकडे पाहत या गरमागरम मेनूचा आस्वाद घेत रानवाऱ्याचं घोंघावणं ऐकत, विजेच लखकन्चमकणं अन्कडाडणं मनाच्या हार्ट डिस्कवर स्टोर करत कसा वेळ जातो तेच कळत नाही. बराच वेळ गेल्यावर थोडंस भिजावसं वाटतं, पाय मोकळे करावेसे वाटतात. थोडं डेअरिंग करावंसं वाटतं. जर असं खरंच वाटत असेल, तर इथे अशा जिगरबाज भटक्यांसाठी कावळ्या किल्ला सज्ज आहे.
कावळ्या किल्ला तसा बराच मोठा आहे. ताेफोडूनच वरंधा घाटाचा शेवटचा टप्पा तयार केला आहे. श्री वाघजाई मंदिराच्या बरोबर वरच्या भागात डोंगरमाथ्याजवळ नऊ टाक्यांचा समूह आहे. कोणे एके काळी तो कावळ्या किल्ल्याचा एक भाग होता. भजी-वडे-चहाच्या टपऱ्यांच्या बाजूने अवघ्या दहा-पंधरा मिनिटांतच इथं जाऊन पोहोचता येतं. पाण्याला जीवन का म्हणतात? ते इथं आल्यावर कळतं. काळ्याशार पाषाणात खोदलेली पाण्याची ती टाकी कित्येक वर्षेकित्येकांची तहान भागवत असेल कोण जाणे. ओल्या वाटेने परत जाताना अंगावरचे कपडे हमखास रंगतात, कारण पायवाटच तशी रंगिली आहे.
परत एकदा आपण डांबरी रस्त्यावर येतो. उजव्या हाताच्या वळणावर कावळ्या किल्ल्याकडे जाणाऱ्या पायवाटेवर नजर स्थिरावते. बांधीव पायऱ्या पार करून अरूंद पायवाटेने कारवीच्या झाडीतून हृदयाची धडधड वाढवणारा ट्रेक सुरू होतो. वरंधा घाटाच्या उत्तरेला पसरलेल्या डोंगराच्या सोंडेवरून जाताना, डावीकडे खाली वरंधा घाटाचा कोकणात उतरत जाणारा वळणावळणाचा रस्ता दिसतो. इथून पाय सटकला, की थेट समर्थांच्या शिवथरघळीत! तेव्हा जर कोकणात जायचं नसेल, तर देशावरच्या मातीत सावधपणे पावलं टाकत टाकत जायला हवं. डोंगरधारेच्या कड्यावरून जाणारी अरुंद पायवाट एका सपाटीवर येऊन थांबते. तशी सपाटीही अरुंदच. तिथून पुन्हा एकदा कारवीची झाडी बाजूला करत करत शेवटी एका टेकाडाची उतरण उतरून अखेरची चढाई समोर येते. इथून वरंधा घाटाचं मस्त दर्शन घडतं. डोंगराच्या सोंडेच्या शेवटी जोत्याचे अवशेष आणि ढासळून गेलेल्या बुरुजाचे अवशेष दिसतात.
कोकणातला निसर्ग पाहत काही वेळ इथेच शांत उभं राहायला हवं. निसर्गगीत अनुभवायला हवं. परतीच्या प्रवासात डोळ्यांत साठवलेले ते पावसाचे चार क्षण, अरूंद पायवाटेवरून अनुभवलेला तो थरार, कारवीच्या झाडाचे ते काडकन्मोडणं आणि त्याचा आवाज ऐकून काळजात लख्ख होणं, अन्लगेच त्यातून सावरणं हे सारं सारं काही आठवत राहतं. हसता हसता रडवणारा आणि रडत रडत हसवणारा हा ट्रेक एन्जॉय करायचा असेल तर वरंधा घाटाच्या दिशेने आपल्या गाडीची चाकं वळवायला हवी.