जीवन गाण (8MAR11)
या सृष्टीचे मंजुळ गाणे
जगणे मजला शिकवून गेले,
झिलमिलणारे चंद्र चांदणे
जगणे मजला शिकवून गेले!
भरकटलेल्या जगात नाही
संस्कारांची जाण कुणाला,
तुळशीवरल्या त्या पणतीचे
जळणे मजला शिकवून गेले!
प्रेम काय ते कुणा न ठावे
नदी सागरा जीव का लावे?
स्वैर होऊनी नदीचे पळणे
जगणे मजला शिकवून गेले!
बुलंद तरीही असे हौसले
पिल्लासाठी किती सोसले,
चिवचिवणाऱ्या चोचीमधले
दाणे मजला शिकवून गेले!
सागराची अथांगता अन्
ही वृक्षाची स्थितप्रज्ञता,
दुसऱ्यासाठी घाव सोसणे
जगणे मजला शिकवून गेले!